Login

Login page

Simple Login Page

Username Password

शनिवार, १७ डिसेंबर, २०११

लसून

लसणामुळे फक्त जेवणच चविष्ट होते असे नाही, लसणामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. जाणून घेऊ की या छोट्या लसणामध्ये कोण कोणते गुण लपलेले आहेत.

रोज लसणाचे सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, एंटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.

एंटीबायोटिक - प्रथम लसणाला सोलून घ्या, लसणाच्या एका कुडीचे ३ ते ४ तुकडे करा. दोन्ही वेळेच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने लसणाचे दोन तुकडे तोंडात ठेऊन चगळा त्यानंतर पाणी प्या.

डोके दुखीसाठी रामबाण उपाय - एका लसणाच्या ४ कुड्या तीस ग्राम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडे गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा डोके दुखणे थांबेल.

दमा दूर करण्यासाठी उपयुक्त - दम्याच्या त्रासावर लसून हे एक उपयुक्त औषध आहे. ३० मिली दुधामध्ये लसणाच्या पाच कुड्या टाकून दुध गरम करा. रोज हे गरम दुध पिल्याने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अद्र्काच्या चहामध्ये थोडा लसण टाकल्याने दमा नियंत्रित राहतो.

आयुर्वेदीय

तक्रार :- ताप येणे

आयुर्वेदीय :-
त्रिभुवन कीर्ति चंद्रकला वात विध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस काली मूर अ‍ॅकोनाईट
अ‍ॅलोपॅथी :-
क्रोसिन गोळ्या किंवा कोसिन सायरप
घरगुती उपाय :-
कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.

तक्रार :- सर्दी

आयुर्वेदीय :-
त्रिभुवन कीर्ति, सूक्ष्म त्रिफला, भल्लातकासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस, नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-
बेनेड्रिल
घरगुती उपाय :-
आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून

तक्रार :- खोकला

आयुर्वेदीय :-
अनंद भैरव रस सितोपलादि चूर्ण, कायारि वटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कल्फेरिआ फॉय नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-
ग्लायकोडिन बेंझोसिन
घरगुती उपाय :-
लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटणा जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी

तक्रार :- जुलाब

आयुर्वेदीय :-
संजीवनई कुटजारिष्ट शंखोदर अतिविषादि चूर्ण
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
नेट्र्म फॉस नक्स व्होमिका
अ‍ॅलोपॅथी :-
सल्फागॉनडिन एन्ट्राव्हायोफॉर्म
घरगुती उपाय :-
सुंठ + जायफळाचे चाटण वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.

तक्रार :- आव (रक्त पडत नसेल तर)

आयुर्वेदीय :-
संजीवनी कुट जारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली मूर मॅग्नेशियम फॉय
अ‍ॅलोपॅथी :-
मेट्रोजिल
घरगुती उपाय :-
मिरा + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण

तक्रार :- उलट्या

आयुर्वेदीय :-
प्रबाळ पंचामृत सूतशेखर
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
इपिकॅक्यूना नक्यहोमिका नेट्रम मूर काली मूर
अ‍ॅलोपॅथी :-
स्टेमेटिल
घरगुती उपाय :-
मोरावळा, आले-लिंबाचे चाटण, महाळुंगपाक

तक्रार :- तोंड येणे

आयुर्वेदीय :-
कामादुहा-दुधातून तोंडाला लावणे
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली मूर लावण्यासाठी नेट्रममूर पोटात
अ‍ॅलोपॅथी :-
ग्लिसरिन बोरॅक्स
घरगुती उपाय :-
जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.

तक्रार :- पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन

आयुर्वेदीय :-
प्रवाळ पंचामृत सूतशेखर शंकवटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
नेट्रम सल्फमॅगेनिशयम फॉस मिलिका
अ‍ॅलोपॅथी :-
झायमेट डॉयव्हाल स्पेंशिनडॉन-बॅर-ल्गन्‌
घरगुती उपाय :-
भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा +लिंबू

तक्रार :- जंत कृमि

आयुर्वेदीय :-
कृमिमुरगर रस विडंगारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- सीना
अ‍ॅलोपॅथी :- हेल्मासिड, अ‍ॅडल्फिन इबेन
घरगुती उपाय :- वावडिंगाचे चूर्ण मधातून कपिल्लाची गोळी गुळातून

तक्रार :- सांधे दुखी

आयुर्वेदीय :-
सिंहनाद गुग्गुळ वातविध्वंस आर कंपाऊंड
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कल्केरिआ फॉस, मॅग्नेशियम फॉस, काली सल्फ
अ‍ॅलोपॅथी :-
ब्रुफेन
घरगुती उपाय :-
सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक

तक्रार :- मूत्र विकार

आयुर्वेदीय :-
चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ पुनर्मवासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-
अल्फानाइन मिक्चर
घरगुती उपाय :-
धने जिऱ्याचे पाणी वाळ्याचे सरबत गोखरूचा काढा

तक्रार :- रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे )

आयुर्वेदीय :-
कोहळ्याचे पाणी चंद्रकला बोलबद्ध रस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-
क जीवनसत्त्व, के जीवनसत्त्व
घरगुती उपाय :-
लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण

तक्रार :- मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता )

आयुर्वेदीय :-
ब्राह्मीप्राश, अश्वगंधरिष्ठ, सारस्वतारिष्ठ, उन्मादगज केसरी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-
काम्पोज
घरगुती उपाय :-
वेखंडाची पूड हातापायास चोळणे कांद्याची दह्यातील कोशिंबीर

तक्रार :- पित्त उठणे, अ‍ॅलर्जी

आयुर्वेदीय :-
सूतशेखर आल्याच्या रसातून चंद्रकला + आरोग्यवर्धिनी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
हिपार सल्फ
अ‍ॅलोपॅथी :-
इन्सिडाल एव्हिल
घरगुती उपाय :-
अमसुलाचे पाणी

तक्रार :- भाजणे, पोळणे

आयुर्वेदीय :-
शतधौत धूत
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कन्येरिस मलम
अ‍ॅलोपॅथी :-
बर्नाल
घरगुती उपाय :-
तूप लावणे

तक्रार :- मुरगळणे लचकणे

आयुर्वेदीय :-
लेप गोळी पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
अर्निका मलम पोटात अर्निका
अ‍ॅलोपॅथी :-
आयोडेक्स पोटात रिड्युसिन
घरगुती उपाय :-
रक्तचंदन, तुरटी, हळद यांचा लेप

तक्रार :- जखमा

आयुर्वेदीय :-
शोअधन तेल लावणे, पोटात सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कॅलेंडुला मलम, कल्केरिआ सक्फ पोटात
अ‍ॅलोपॅथी :-
बर्नाल, जोनसनच्या पट्ट्या, पोटात सल्फा गोळ्या
घरगुती उपाय :-
स्वच्छ खोबरेल तेल

तक्रार :- दातदुखी

आयुर्वेदीय :-
लवंगेचे तेल पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरमफॉस मॅग्नेशियम फॉस कल्केरिआ फ्लूर
अ‍ॅलोपॅथी :-
लांग तेलाचा बोळा, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :-
तुपाचा बोळा

तक्रार :- कानदुखी

आयुर्वेदीय :-
सब्जाचे किंवा तुळशीचे तेल कानात घालणे, पोटात यू त्रिफला वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली सल्फ नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-
वॅक्सोल्व कानात घालणे, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :-
लसणीचे तेल कानात घालणे

तक्रार :- कातडीचे सामान्य विकार ( त्वचा रोग )

आयुर्वेदीय :-
आरोग्यवर्धिनी, गंधक रसायन सारिवाद्यासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कल्केरिआ फॉस नेट्रम सल्फ
अ‍ॅलोपॅथी :- ...
घरगुती उपाय :-
हळदीचा लेप गोमूत्रातून पोटात हिरडा उगाळून तुळशीचा रस लावण्यासाठी

सोनामुखी

सोनामुखी


सोनामुखी हे एक बहुवर्षीय झुडूप असून साधारणपणे ७५ ते १०० सें. मी. पर्यंत वाढते. सोनामुखीचे खोड सरल वाढून त्याच्या पानाचा आकार किंचित मोठा व फुलाचा रंग पिवळा असतो.
सोनामुखूला शास्त्रीय परिभाषेत  Cassia angustifolia असे म्हणतात. ही वनस्पती Leguminoceae  या कुंटुंबातील असून तिचे उगमस्थान सौदी अलेबिया आहे. भारतात तामिलनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट, कर्नाटक इ. राज्यात सोनामुखीची लागवड जास्त प्रमाणात करण्यात येत होती. परंतु अलीकडील काळात गुजरात व राजस्थान या राज्यमध्ये सर्वात जास्त उत्पत्न घेतले जाते. या  वनस्पतीचे भारतामध्ये सर्वात जास्त उत्पत्न घेतले जाते. जर्मनी, जापान, अमेरिका, इंग्लड, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व इतर ४० देशांमध्ये निर्यात केली जाते व त्यापासून वार्षिक १५ कोटी रुपयाचे विदेशी चलन मिळते.

औषधी उपयोगः
औषधीकरिता प्रामुख्याने सोनामुखूंच्या वाळलेल्या पानांचा उपयोग करतात. पानांमध्ये सोनोसाईडस् हे महत्वाचे औषधी घटक आहे. पानाप्रमाणेच शेंगाचा सुध्दा औषधीकरीता उपयोग होतो. सोनामुखीचा  स्वाद कडवट, चिकट व उत्तेजक असतो. हे एक रेचक म्हणून उपयागात अणतात. पोटाच्या सर्व विकारावर याचा उपयोग होतो. पचनशक्ती वाढविणे, भूक वाढविणे, शौचास साफ होण्याकरिता व चेहन्यावरील मुरुम तसेच मोठया पेशीमधील वायृ दूर करण्यासाठी सुध्दा याचा उपयोग होतो.

सफेद मुसळी Chlorophytum borivilianum



 शास्त्रीय नाव - Chlorophytum borivilianum , कुळ- Liliaceae , मराठी नाव- पांढरी मुसळी,सफेदा हिंदी नाव- सफेद मुसली, धोली मुसली संस्कृत नाव- मुसला 




सफेद मुसळीमध्ये कॉबोर्हायड्रेट्स , प्रथिने , सॅफोजिनीन , सॅपिनिन हे घटक त्याचप्रमाणे कॅल्शियम , पोटॅशिअम , सोडियम , मॅग्नेशियम , फॉस्फरस , झिंक आणि कॉपर इत्यादी खनिज पदार्थ आढळतात.

पुरुषांच्या दृष्टीने बलकारक असलेली सफेद मुसळी वेगवेगळया रोगांवर देखील उपायकारक ठरते. तथापि , सफेद मुसळीचा बहुतांश वापर शक्तीवर्धक म्हणूनच प्रामुख्याने होत असतो.

पांढऱ्या रंगाची परंतु मुसळीच्या आकाराची मुळे आढळणाऱ्या एकदल वनस्पती सफेद मुसळी नावाने ओळखल्या जातात. त्यामुळे अमुक एका ठराविक प्रकारच्या वनस्पतीची मुळे ही खरी सफेद मुसळी असे म्हणणे कठीण जाते.

विविध प्रांतांत या वनस्पतीच्या नावाचा अपभ्रंश झालेला दिसतो. सफेता किंवा सफेदा , मुसली , सुफेद किंवा सफेत मुसळी , मुसली सफेद , ढोली मुसली , उजिली मुसली , सुरीमुसली ही नावे प्रचलित असली तरी काही प्रदेशांत नावातही बराच बदल आहे , असे डॉ. पाटील यांनी ' मटा ' शी बोलताना सांगितले.

शाकाकूल , झांगणी , झिमा , सातेमुली , सिबोजाता कौंता , एनसुंगी , सतनुली , बालुबलुआ , ईश्वरजटा , बायकुचारे , पैना साफेदी , निरामुठी , सदाबोरी , ससादतली , पिरीजाडू , कुलाई , जानजारी , कुरकुट्टी ही नावे भिन्न असली तरी या वनस्पतींचा उपयोग सफेद मुसळीसारखाच होता.

एतावर किंवा शतावरीच्या जाती ज्या ' अस्परायस ' वर्गात मोडतात त्यांचाही सफेद मुसळीच्या नावाने वापर होतो. अस्परायस अडसंडेन्स हीच खरी सफेद मुसळी आहे , असे आग्रही प्रतिपादन बॅट , दुरी , कितीर्कर आणि बसु या वनस्पतिशास्त्रज्ञांनी केले आहे.

याच जातीस सफेद मुसळीशिवाय झांगणी , झिमा , उजिली किंवा ढोली मुसली असेही म्हणतात. ' अस्परायस फिलिसिनस ' या वनस्पतीला मुसळी सफेद म्हणून संबेाधतात. तसेच ' अस्परायस रेसिमोसस ' शतावरी म्हणून प्रसिध्द असून काश्मिर , भूतान , हिमालय , खासी हिल्स , आसाम , चीन आणि म्यानमार या प्रातांमध्ये मुसली सफेद या नावाने तिला ओळखतात.

क्लोरोफायअम या वर्गाखाली समाविष्ट होणाऱ्या जातीविषयी जवळजवळ असाच प्रकार आढळतो. ' क्लोरोफायटम बोरीविलीयानम ' या जातीस खानदेश , गुजरात , मध्यप्रदेश व इतर काही ठिकाणी सफेद मुसळी म्हणून वापरतात. त्यामुळे सफेद मुसळी ही अमुक एकाच प्रकारच्या वनस्पतीपासून मिळते असे नाही.

ही सर्व औषधी वनस्पती एकमेंकांस पर्याय असून जेथे जे उपलब्ध असेल ते वापर करू शकतात , त्यामुळे कोणीही खऱ्या सफेद मुसळीच्या संभ्रमात पडू नये

सर्पगंधा (Rauwolfia serpentina)

सर्पगंधा (Rauwolfia serpentina)



भारतात बऱ्याच ठिकाणी या झाडास सर्पगंधा या नावाने ओळखली जाते. काही ठिकाणी शास्त्रीय नावावरून राउवोल्फिया या नावानेपण ओळखतात. हे शास्त्रीय नाव जर्मन वनस्पती तज्ञ आणि वैद्य लिओनाई राउवोल्फ यांच्या नावावरून देण्यात आले आहे.
वर्णन
३०-७५ सेमी. उंच ताठ सरळ गुळगुळीत क्षुप, पाने मंडलाकार, ८-२० सेमी. लांब निमुळते होत पर्णवृतांत सांमीलित होणारी, फुले सुमारे १.५ सेमी. लांब दले पांढरी किंवा फिकट गुलाबी, पुष्पबंधाक्ष गर्द लाल, लहान गुच्छांमध्ये, फळे लहान गोल, पक्व झाल्यावर गर्द जांभळी किंवा काळपट.
वितरण
१०० मीटर उंचीवर हे झाड भारतात सर्वत्र सापडते. हिमालयाच्या पायथ्याशी, पुर्व आणि पश्‍चिम घाटाच्या कमी उंचीच्या पर्वत रांगामध्ये हे झाड सर्वसामान्यपणे सापडते. ते बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राच्या अनेक मैदानी सपाट जागेवरूनही गोळा करण्यात आलेले आहे. सध्या हे झाड अनेक जागी लावण्यात येते.
औषधी गुणधर्म
सालीसह वाढवलेली मुळे या झाडापासून मिळणारे औषध आहे, मात्र ती शक्यतो ३-४ वर्षाच्या झाडांपासून हिवाळ्यात जमा करण्यात आलेली असावीत. राउवोल्फिया, भारतीय औषधात ४००० वर्षापुर्वीपासून माहीत होते असे समजण्यात येते. चरकाच्या ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. या झाडाच्या मुळात अनेक ऍल्कलॉइडस असतात या औषधाचा मुख्य उपयोग उपशामक म्हणून निद्रेसाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. सध्या या औषधाचा उपयोग मनोविकारात आणि उच्च रक्तदाबात मोठया प्रमाणावर होतो. उपशामकतेस या औषधाने वेळ लागतो म्हणुन तीव्र त्रास असलेल्या रूग्णांसाठी हे फारसे उपयोगी नाही. प्राथमिक व सौम्य अवस्थेत असलेल्या रूग्णांसाठी किंवा जुन्या मानसिक विकारावर ते अतिशय योग्य औषध आहे. या औषधात मन शांत स्थिर ठेवण्याचा गुणधर्म आहे. श्वासनलिका सुजलेल्या, दम्याच्या व जठरात क्षत असलेल्या रूग्णांना हे औषध देण्यात येऊ नये.

या झाडांची मुळे उदराच्या रोगावर आणि ज्वरात सुध्दा उपयोगी आहेत. सर्पगंधा या प्रजातीच्या इतर जातीही (टेट्राफिला L. syn रा. कॅनसेनस L) औषधी म्हणून उपयोगी आहेत.



तुळशी (Oscimum sanctum)

तुळशी (Oscimum sanctum)



 तुळशी
हे भारतीयांचे प्रसिध्द आणि पवित्र झाड आहे. ती बहुशाखीय ताठ - सरळ, ७५ सेमी. पर्यंत वाढणारी औषधी आहे, सर्व अवयव केसयुक्त, पाने संमुख, सुमारे ५ सेमी. लांब, कडा दातेरी किंवा साध्या, वरच्या व खालच्या पृष्ठभागावर केंसाळ, बारिक ग्रंथीच्या ठिपक्यांनीयुक्त, सुवासिक, फुले लहान, जांभळट किंवा तांबुसआरक्त, लहान दाट, गुच्छ, सडपातळ कणिसात, फळे लहान बिया पिवळसर किंवा तांबूस-आरक्त.
वितरण
हे झाड भारतात सगळीकडे, घरांमध्ये, बागामध्ये आणि मंदिरामध्ये लावले जाते. बऱ्याच जागी ते जंगली स्वरूपातही उगवते.
औषधी गुणधर्म
या झाडाची पाने आणि बिया औषधी आहेत. पानांपासून काढलेल्या तेलात जीवाणू व कीटाणू नष्ट करण्याचा गुणधर्म आहे. पानांचा काढा किंवा रस फुफ्फूसाच्या नळ्या सुजण्यावर, पडशावर, पचनाच्या विकारात उपयोगी आहे. ते त्वचारोगावर व नायट्याच्या जागी लावण्यात येते. पानाच्या रसाचे थेंब कर्णशूल थांबविण्यासाठी कानात टाकण्यात येतात. पानांचा काढा घरगुती उपाय म्हणून सर्दी पडशासाठी नेहमी वापरण्यात येतो. बिया मूत्र उत्सर्जन संस्थेच्या रोगावंर उपयोगी आहेत. मलेरियाच्या ज्वरात घाम येण्यासाठी तुळशीच्या मुळांचा काढा देण्यात येतो.

घाणेरी

लॅटीन नावः Lantana camara L. var. aculeata
कुळ : Verbenaceae (निर्गुडी कुळ)
इतर नावे: तांतानी
उपयोगी भागः मूळ

निर्गुडी कुळातली अतिशय उपयुक्त वनस्पती...पण ग्रंथोक्त नसल्याने वापरली जात नाही. ही शिवण, सागवान किंवा जीतसाया यापेक्षा अधिक तीव्र पण निर्गुडीपेक्षा सौम्य आहे. "Fistula in ano" या दुर्धर आजारात घाणेरीच्या मुळांचा काढा दारुहळद, देवदार, मंजिष्ठा यांबरोबर वापरल्यास शस्रक्रियेची गरज रहात नाही किंवा त्याची व्याप्ती तेवढी कमी करता येते. घाणेरी सागवान किंवा शिवणप्रमाणे गर्भ संरक्षक म्हणुन वापरता येत नसली तरी गर्भ रहावा म्हणुन गर्भाशयाच्या शोधनकार्यात या दोन्ही वनस्पतींपेक्षा उजवी ठरते. घाणेरीच्या मुळांच्या चुर्णाने खाज असणारी, ठणकणारी, रक्तस्त्राव होणारी मूळव्याध ताबडतोब कमी होते तसेच याबरोबर हिरडाचूर्ण वापरल्यास मूळव्याध पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी होतो.

कपाळफोडी,Cardiospermum helicacabum L.

नावः कपाळफोडी
संस्कृत नावः काकमर्दनिका, कर्णस्फोटा
लॅटिन नावः Cardiospermum helicacabum L.
कूळः Sapindaceae (रिठा कूळ)



इतर नावे: कानफुटी, लटाफटकी, नयफटकी, कनफूटी, करोटीओ
उपयोगी भागः पाने
उपयोगः याच्या पानांचा रस कान फुटल्यास वापरतात. नविन संधीवातात ही वनस्पती उपयुक्त आहे. पण एकेरी वापरु नये, उलट्या जुलाब होऊन उपयोगी पडत नाही, त्याबरोबर सुगंधी वनस्पती घ्याव्या लागतात. कपाळफोडीच्या पानांचा रस, कंकोळ, दालचिनी, लेंडीपिंपळी, एरंडेल किंवा एरंडीच्या पानांचा रसातुन घेतल्यास संधीवात सुरवातीसच कमी होतो.


पूरे संयंत्र स्वेदजनक है, मूत्रवर्धक, उबकाई, आर्तवजनक, रेचक, सर्द, रक्तिमाकर, भूख बढ़ानेवाला और स्वेदकारी [218]. यह गठिया के इलाज, स्नायु रोग, अंग और सर्पदंश के [240 कठोरता, 243] में प्रयोग किया जाता है. पत्तियों रक्तिमाकर हैं, वे गठिया के उपचार में एक प्रलेप के रूप में लागू कर रहे हैं. [240, 243]. उन से बनी चाय खुजली वाली त्वचा के उपचार में प्रयोग किया जाता है. [218] नमकीन पत्ते सूजन पर एक प्रलेप के रूप में उपयोग किया जाता है. [218] पत्ती का रस कान का दर्द के लिए एक इलाज के रूप में इस्तेमाल किया गया है. [240, 243]. जड़ स्वेदजनक, मूत्रवर्धक, आर्तवजनक, रेचक, और [240] रक्तिमाकर है. यह कभी कभी गठिया, लूम्बेगो, और तंत्रिका [240] बीमारियों के उपचार में प्रयोग किया जाता है.

मण्डुकपर्णी,Centella asiatica,ब्राम्ही,

संस्कृत नावः मण्डुकपर्णी, माण्डुकी
लॅटिन नावः Centella asiatica, Hydrocotyle asiatica
कूळः Apiaceae, Umbelliferae

इतर भाषिक नावे: मराठी- ब्राम्ही, कारिवणा, हिंदी- ब्रम्हमाण्डुकी, ब्राम्हीभेद, ब्रम्हो, ब्रम्ही, गुजराती- ब्राम्हो, खडब्राम्ही, ब्राम्ही, इंग्रजी- इंडियन पेनीवर्ट
उपयोगी अंगः पंचांग (विशेषकरुन पाने)
या वनौषधीची पाने बेडकाच्या पंजासारखी दिसतात म्हणुन याला मण्डुकपर्णी म्हणतात.
त्वचेच्या रोगात ब्राम्ही उत्तम गुणकारी आहे. कुष्ठामध्ये त्वचेवर लेप करतात. ब्राम्ही रस व त्याच्य दहा पट तेल एकत्र करुन सिद्ध केलेले तेल डोक्याला लावण्यासाठी श्रेष्ठ आहे. याने मेंदू थंड रहातो, केसांची वाढ होते, स्मृती वाढते. मनःशांतीसाठी तसेच शांत झोप लागण्यासाठी ब्राम्ही अत्यंत उपयोगी आहे. रक्तशुद्धीवर, मेंदुच्या विकारांवर, जुनाट इसबावर ब्राम्हीच्या व गुंजेच्या पानांचा रस देतात. भूक वाढविण्यास ब्राम्ही अत्यंत उपयोगी आहे. कास, श्वास, स्वरभेदात, हृदय दौर्बल्यात ब्राम्ही उपयुक्त आहे. ब्राम्हीमुळे बुद्धीची धारणाशक्ती वाढते. पाने उकळुन तयार केलेला काढा महारोगावर वापरतात. क्षयरोगात, मूत्रकृच्छावर, अपस्मार/उन्मादावर याचा रस वापरतात. बोबडे बोलणा-या मुलांना ब्राम्हीची पाने खाण्यासाठी देतात.

ब्राम्ही (मंडुकपर्णी) व नीरब्राम्ही या दोन्ही वनस्पती सर्वसाधारणपणे सारख्या गुणधर्माच्या आहेत. परंतु, मुख्यतः मंडुकपर्णी या वनस्पतीचे कार्य त्वचेवर दिसते तर नीर ब्राम्हीचे कार्य मज्जातंतूवर दिसते. अर्थात दोन्ही वनस्पती उन्माद, अपस्मारावर उपयुक्त व मनःशांती करणा-या आहेत.
नीर ब्राम्हीची मुख्यतः क्रिया मगज व मज्जातंतूच्या रोगावर होत असते. त्यामुळे मेंदूस पुष्टी मिलते. नीर ब्राम्ही मज्जातंतुंचे पोषण करणारी, मज्जासाठी मूल्यवान व शक्तिवर्धक आहे. आचके येणे, बेशुद्ध अवस्था इ. मज्जासंस्थेच्या रोगांसाठी मानसिक रोगात हिचा वापर करतात. बुद्धी स्मरणशक्ती,व आयुष्य वाढण्यासाठी ब्राम्ही चूर्ण मधातुन देतात. ज्वरात भ्रम, प्रलाप, उन्माद इ. लक्षणे असल्यास ब्राम्हीचा लेह देतात. उदासिनपणा, मनोदौर्बल्य दूर करण्यासाठी, बुद्धीवर्धनासाठी नीर ब्राम्हीचा उपयोग होतो.
लहान मुलांच्या सर्दीत, खोकल्यात पानांचा रस देतात. यात वमनकारक व रेचक गुण असल्याने कफ उलटुन पडतो व रोग्यास आराम मिळतो. डांग्या खोकल्यात ब्राम्हीचा लेह देतात.
नीर ब्राम्हीत 'ब्राम्हीन' नावाचे अल्कलॉईड हृदयासाठी शक्तिवर्धक आहे. ते हृदयास शक्ति आणि नियमितपणा प्रदान करते.
पित्तशमनसाठी ब्राम्हीचा स्वरस देतात. नीर ब्राम्हीमुळे लघवीचे प्रमाण वाढते. मूत्रदाह, शूल, लघवीतुन रक्त पडणे, मूतखडा यांमधे नीरब्राम्हीचा उपयोग होतो. ब्राम्ही स्वरसात, त्रिफळा, कचोरा, वाळा इ. द्रव्ये टाकुन सिद्ध केलेले तेल केसांच्या वाढीसाठी व मनःशांतिसाठी उपयुक्त आहे.

अग्निशिखा,खड्यानाग,Gloriosa superba L

संस्कृत नावः अग्निशिखा, कालिकारि
इतर नावे: खड्यानाग, बचनाग, लांगलीकंद, कलिहरी
लॅटिन नावः Gloriosa superba L.
कूळ: Liliaceae (कळलावी कूळ)

उपयोगी भागः कंद
उपयोगः
कळलावीला पांढरा बचनाग म्हणुन ओळखले जाते, परंतु पांढ-या बचनागाशी याचे कोणतेही साम्य नाही . पांढरा बचनाग ( Aconitum napellus) वनस्पती हिमालयात आढळते. गर्भपातासाठी कळलावी वापरणे अतिशय चुकीचे आहे. तसेच सर्पविषावरही याचा उपयोग होत नाही. कळलावीच्या कंदाच्या चकत्या ताकात पाच दिवस भिजवुन नंतरच वापरतात. हे औषध योग्य प्रमाणात वापरल्यास संधिवाताची तिव्रता कमी होते. त्याहीपेक्षा अजुन अल्कोहोलमधे तयार केलेला अर्क अधिक उपयुक्त आहे आणि अगदी १ ते २ थेंब ही घेतला तर चालतो.

खडकी रास्ना,Tylophora indica

नावः खडकी रास्ना
विविधभाषी नावे: मराठी- खडकी रास्ना, पित्तमारी, पित्तकारी, अंतमूळ, पित्तवेल
संस्कृत- मूलरास्ना, पित्तवल्ली, अंत्रपाचक, अर्कपत्री, मूलिनी
हिंदी- अंतमूळ, जंगली, पिंकवान
गुजराती- जडीबुटी, दमनी
लॅटिन नावः Tylophora indica, Tylophora asthmatica
कूळः Asclepiadaceae अस्कलपिडीएसी

उपयोगी भागः पाने, मूळ
उपयोगः या वनौषधीत 'टायलोफोराईन' नावाचे अल्कलॉईड असते. पानांचा काढा किंवा मूळांचा अर्क दमा व अमांशावर मौल्यवान औषध आहे.
खडकी रास्नाची क्रिया एपिकॅकसारखी आहे. ती अतिसाराच्या उपचारात उपयोगी आहे. मूळांचा किंवा पानांचा काढा दम्यात आणि फुफ्फुसांच्या नळ्या सुजण्यावर देण्यात येतो म्हणुन दम्यात आराम मिळविण्यासाठी खडकी रास्नाचा उपयोग करण्यात येतो. अजिर्णात आणि पित्तप्रकोपात याच्या मुळाची साल पाण्यात घासुन देतात. कफ रोगात वेखंड व सुगंधी पदार्थांबरोबर याचा फांट करुन देतात. अंगदुखी व संधिवातात मुळे इतर द्रव्यांबरोबर देतात.
दमा विकारात याचा चांगला उपयोग असल्याने पानांना चांगली मागणी आहे.

गेळफळ

नावः गेळ
संस्कृत नावः करहाट, विषपुष्पक, मदन
इतर नावे: गेळफळ, मैनफळ
लॅटीन नावः Catunaregam spinosa (Thunb.) Tirveng.
कूळः Rubiaceae (गेळफळ कूळ)
उपयोगी भागः फळे
उपयोगः आयुर्वेदामधे वमनचिकित्सेसाठी (उलटी घडवुन आणणे) गेळफळ श्रेष्ठ मानले जाते. त्यासाठी त्याचा गीर वापरला जातो परंतु हा प्रयोग तज्ञांच्या देखरेखीखालीच केला जातो.
गेळफळाची साल अतिसारावर उत्कृष्ठ काम करते. कुडासाल आणी गेळफळाची साल समभाग एकत्र करुन अल्सरेटिव्ह कोलायटीसवर वापरतात. हुरमळ बी, गेळफळाचा गीर, खैराची साल व पिंपळाची लाख एकत्र मिश्रण योग्य देखरेखीखाली वजन कमी करण्यास व त्याचबरोबर असलेले घोरणे, खोकला, सुस्ती , सांधेदुखी कमी करण्यास वापरतात.

शनिवार, १० डिसेंबर, २०११

औषधी वनस्पती



आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या पाच महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती घेणार आहोत.
1.    कडूनिंब
हे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पानेफळेतसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक आहे. त्याच्या खोडाच्या बाहेरील भागाचा काढाही ब-याच आजारांवर उपायकारक ठरतो. या झाडाची लागवड करणं आणि त्याची काळजी घेणं हे आपल्या फायद्याचं आहे.
कडूनिंब तेल असे तयार करावे
कडूनिंबाच्या पानांचा पाणी घालून 100 मि.लि. ताजा रस काढावा. त्यात 25 मि.लि. तिळाचं तेल घालावे. मंद आचेवर ते झाकून उकळावे. साधारण अर्ध्या तासात त्यातील पाण्याचा अंश निघून जातो. उरलेलं मिश्रण गार करून गाळावे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकतं. जखमेवर हे लावल्यास ती लवकर बरी होते.
बाळंतपणातल्या जखमा ब-या होण्याकरतादेखील कडूनिंबाची पानं घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज 15 मिनिटे बसावे.
2.    तुळस
तुळस म्हणजे 'वनस्पती लहान पण गुण महानअसे आहे. तुळशीची पानं ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.
याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजेजळजळपायांची आगतोंड येणेनाकातून रक्त येणे,रक्ती मूळव्याधइत्यादींकरता घेतात. ह्या बिया दूधकिंवा तुपाबरोबर घ्याव्यात. 20 ते30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एका वेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीन चार वेळा करावं.
सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे -
एक कप तुळशीची पानं पाच मिनिटे पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळावी. याचा 20 मि.लि. म्हणजे साधारण अर्धा कपइतका रस काढावा. इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी. हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होतो.
3.    कोरफड (कुमारी)
या वनस्पतीचा उपयोग जखमेवरची मलमपट्टी म्हणून छान होऊ शकतो. जखमेच्या आकाराचा कोरफडीचा तुकडा कापा. जखम धुऊन घ्या. तुकडयाची ओली बाजू जखमेवर ठेवून वरून पट्टी बांधा. कोरफड पट्टी रोज बदला. याने जखम लवकर बरी होईल. भाजल्यामुळे झालेल्या जखमांवरदेखील कोरफडीची मलमपट्टी लागू पडते. ब-याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. यकृताचे आजारस्त्रियांचे आजार आणि खोकला यावर हे खूप गुणकारी आहे.
आपण कोरफड आपल्या बागेत लावू या आणि लोकांनाही लावायला सांगू या. कोरफड कणखर असते आणि वर्षानुवर्षे वाढते व टिकते .
4.    अडुळसा
या झुडुपाचा उपयोग खोकला बरा होण्यासाठी करतात. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. रस मधाबरोबर दिला जातो. 50-60 अडुळशाची पाने स्वच्छ धुऊनती एक लिटर पाण्यात अर्ध्या तासाकरता मंद आचेवर उकळावी. साधारण पावपट पाणी उरले पाहिजे. हा काढा गार करून गाळून ठेवावा. खोकला झाल्यास 20 मि.लि. काढा दिवसातून 2 ते 3 वेळा या प्रमाणात 3 दिवस द्यावा. लहान थोर व्यक्तींना हा काढा उपयुक्त आहे. हे असताना इतर खोकल्याच्या बाटल्यांची गरज नसते.
5.    कुडा
हे जंगलात सापडणारं झाड आहे. त्याची शेंगेसारखी फळं पिकल्यावर काळी होतात ही फळे जोडीने लटकलेली असतात. म्हणून ती मध्ये जोडलेल्या दोन शेवग्याच्या शेंगांसारखी दिसतात. या झाडाच्या खोडाचे साल औषधी असते. जुलाब आणि आव यासाठी ते वापरतात. खोडाच्या सालाचा एक तुकडा कुटून त्यात एक चमचा मध मिसळून औषध तयार केले जाते.
कुडयाचा काढादेखील करतात. सोळा कप पाण्यामध्ये सालाचे एक कप कूट घालून मिश्रण चार कप होईपर्यंत उकळा. गार करून बाटलीत भरून ठेवा. एका माणसाला एका वेळी 20 मि.लि. काढादिवसातून तीनदा द्यावा.

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

लाजाळू

ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता पाने मिटतात.लाजाळू' (लाजणारे) [लॅटिन भाषेत=pudica = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्या वेळाने परत आधी होतीतशी होतात. ही मुळात दक्षिण अमेरिकेची व मध्य अमेरिकेची वनस्पती आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.
या छोट्या झुडपाचे खोड सरळ असते, परंतु झुडूप जास्त जुने झाले की ते वाकते. खोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळूचे रोपटे जेमतेम गुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते.लाजाळू तिच्या त्वरित हालचालीमुळे ओळखली जाते. संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात व संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श, गरम करणे, धमाका/स्फोट वा हालवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरित होते व तीदेखील मिटतात. ही हालचाल मुख्यतः पानातील टर्गर दाब कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.टर्गर दाब हा कोषिकांच्या आतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. Mimosaceae कुळांमधील झाडांमध्ये हा गुणधर्म असतो.









केवडा

केवडा
लॅटिन नाव - Pandenus tectorius (पॅंडेनस टेक्टोरिअस, पॅंडेनस ओडोराटिसिमस)
इंग्रजी नाव - स्क्रू पाईन
भारतीय नावे - केया(बंगाली), केतकी (संस्कृत), तालेमारा ( कानडी), थाझाई (तमीळ), मुगली ( तेलुगू)
कुल - केतकी कुल
kevada-pandanus-adoratissimus.jpgकुळकथा - पांदन म्हणजे काठीवाला असा मूळ मल्याळी शब्द आहे. त्याच्या लॅटिनीकरणातून पॅंडेनस हे वानसशास्त्रीय प्रजातीवाचक नाम तयार झाले. केतकी कुलातील सर्वच सदस्यांना हे मल्याळी नाव आहे. टेक्टोरिअस या जातीविशेषणाचा अर्थ आच्छादन असा आहे. ओडिराटिसिमस याचा अर्थ सुगंधी असा होतो.
संस्कृत प्राचीन वाङ्मयात केवड्याचा उल्लेख वारंवार येतो. समुद्रकिनार्‍यावरच्या मासळीच्या वासाला उतारा म्हणून केवड्याची बने फ़ुलतात, असा त्यात संकेत आहे. फुलांचा आकार काहीसा हंसासारखा असतो. आणि ती केसांत माळतात. किनार्‍यावरच्या खेड्यांतून केवड्याचे कुंपण घालतात.
केवड्याची बेटे असतात. ही एक मध्यम उंचीची वनस्पती आहे. खोडाला फांद्या फुटतात आणि आधारासाठी मजबूत हवाई मुळे येतात. पाने तलवारीच्या पात्यांसारखी असतात. पाने जवळजवळ एक मीटरभर लांब असतात. आणि त्यांची खोडावरची रचना सर्पिल असते.
फुले दोन प्रकारांतील असतात : नर आणि स्त्रीपुष्पे. नरपुष्पांच्या कणसांना पिवळट सोनेरी छद असतो आणि ते सुगंधी असतात. स्त्रीपुष्पांना वास नसतो.
फळ काहीसे अननसासारखे, भरभक्कम बाठयुक्त, गोलाकार आणि वस्तुत: अनेक फळांचे बनलेले संयुक्त फळ असते. ते प्रथम पिवळे आणि पिकल्यावर रक्तवर्णी होते.
केवड्याच्या पानांच्या चटया विणतात. तसेच त्यापासून कागद तयार करता येतो. पानांपासून निघणार्‍या धाग्यांची मासेमारीसाठी जाळी विणतात. ब्रशचे झुबके करतात आणि हवाई मुळांपासून मिळणार्‍या धाग्यांपासून टोपल्या, टोप्या अणि ब्रश करतात. नरपुष्पांच्या छदापासून अत्तर काढतात. मिठाईतही तो वापरतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी कालव्यांच्या कडेने केवड्यांची लागवड करतात.
जहांगीर बादशहाने 'तुझुक-ई-जहांगिरी' या पुस्तकात आपल्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यामध्ये भारतातील प्रमुख फुलांविषयी लिहिताना केवड्याबद्दल त्याने म्हटले आहे, "या फुलाचा सुगंध अत्यंत उग्र, दूरवर दरवळणारा असतो. इतका, की कस्तुरीचा वासही त्याच्यापुढे फिका पडतो."
कोकणच्या किनारपट्ट्यांवरील मुसलमान कोळ्यांच्या वस्त्यांत एक अत्यंत सुंदर लोकगीत म्हटले जाते. त्याचा अर्थ असा ,"केवड्याच्या झाडांमागून सूर्य उगवत आहे, चंद्र डोळ्यांत सुरमा लावतो आहे, सौम्य चंद्रप्रकाशाने रात्र न्हाऊन निघाली आहे."
लोककथा - विष्णू आणि ब्रह्मदेवामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद जुंपला. शंकर म्हणाले, "या वादाचा निकाल मी एक सोपी परीक्षा घेऊन लावतो. माझे पाय किंवा माझे डोके तुम्हां दोघांपैकी जो आधी शोधून काढेल, तो श्रेष्ठ." इतकं बोलून शंकर गुप्त झाले.
त्यानंतर शंकरांनी एवढे विशाल रूप धारण केले, की त्यांचे पाय किंवा डोक्याचा थांगच लागेना. विष्णू आणि ब्रह्मदेव दोघेही खूप गोंधळून गेले.
मग त्यांनी वेगवेगळ्या दिशांना जाऊन शोध घ्यायचे ठरवले. डुकराचे रूप धारण करून विष्णू पाताळातील सर्वांत खालच्या भागात गेले. त्यांनी रागारागात जमीन खणली, तरी त्याला शंकरांचे पाय काही सापडेनात.
इकडे ब्रह्मदेव हंसपक्ष्यावर बसून उंच उंच उडून आले, पण त्यांनाही शंकरांचे डोके काही सापडले नाही.
निराश होऊन दोघे अरण्याकडे परतत असताना एक केवड्याचे पान आभाळातून खाली पडताना ब्रह्मदेवांना दिसले. शंकर नेहमी कपाळावर केवडा धारण करतात, हे ब्रह्मदेवांना ठाऊक होते. त्यांनी ते पान पकडले आणि विष्णूकडे जाऊन ते म्हणाले, "मला शंकरांचे डोके सापडले आहे. पुरावा म्हणून मी त्यांच्या कपाळावरील हे पान उचलून आणले आहे." विष्णूचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसेना. ते केवड्याला म्हणाले, "हे खरे आहे काय?"
केवड्याने ब्रह्मदेवांची बाजू घ्यायला बढाई मारत सांगितले, "हो खरे आहे. मीच शंकरांच्या कपाळावरील केवड्याचे पान." शंकरांनी ते ऐकले आणि संतापून त्यांनी या खोटेपणाबद्दल केवड्याला शाप दिला आणि त्यांच्या देवळाच्या आसपासही केवड्याला प्रवेश करायला बंदी घातली. तेव्हापासून केवड्याला इतका अलौकिक सुवास येत असूनही त्याचे पान शंकराला कधीही वाहत नाहीत.

शाल्मली

शाल्मली
लॅटिन नाव - Bombax malabaricum (बाँबॅक्स मलबारिकम)
इंग्रजी नाव - रेड सिल्क कॉटन ट्री
भारतीय नवे - रक्तशिमुल (गुजराथी), सेमुल (हिंदी), यमद्रुम, शाल्मली (संस्कृत), इलावम, पुलाई( तमीळ).
कुल - शाल्मली
bombax-savri.jpgकुळकथा - बाँबॅक्स या नावाचे मूळ ग्रीक आहे. त्याचा अर्थ रेशमाचा किडा, मलबारिकम नावामुळे मलबार हे या वृक्षाचे मूळ स्थान असल्याचे सूचित होते. महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर जंगलांत, तसेच नागरी भागांत हा वृक्ष आढळतो. शाल्मलीचा वृक्ष महाकाय, पानगळीच्या जातीचा असून त्याची वाढ जोमाने होते आणि तो अनेक वर्षे जगतो. त्याच्या शाखा नियमित मंडले तयार करतात. त्या विस्ताराने पसरतात. एखाद्याने बाहू पसरावेत, तसा त्याचा आकार दिसतो. खरं म्हणजे संपूर्ण झाडाचा पसारा म्हणजे उपडे ठेवलेले शमादानच वाटते. कोवळ्या झाडाची साल हिरवी असते. तिच्यावर असंख्य टोकदार काटे असतात. झाड जुने झाले, की ती फिकट राखाडी होते. पाने हाताच्या पंजासारखी, संयुक्त प्रकाराची असतात. प्रत्येक पर्णिका भालाकृती आहे. फुले येण्यापूर्वीच सर्व पाने गळून पडतात.
बहुदा फुलांचा रंग लालभडक असतो. पण ती काळपट लाल, भगवी पिवळी किंवा फिकट जांभळीही असू शकतात. फुले फांद्यांना चिकटून वाढतात. ती अतिशय मोठाली, काहीशी मांसल, आणि सर्वांगावर मऊ लव ल्यालेली असतात.
फळ लांबट असते. काळपट तपकिरी बिया कापसासारख्या मऊ धाग्यांच्या वेष्टनांत असतात. फळ तडकले, की बिया रानोमाळ पसरतात.
या वृक्षाचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. लाकडापासून आगकाड्या आणि पेट्या बनवल्या जातात. लाकूड अतिशय हलके असल्याने पाण्यावर तरंगते, म्हणून त्याचे ओंडके मासेमारीच्या जाळ्याला बांधतात. बियांपासून कापूस मिळतो. या झाडाच्या डिंकाला मोचरस म्हणतात आणि तो जखमा भरून येण्यासाठी आदिवासी लोक नेहमी वापरतात. कोवळी फुले उकडून खाल्ली जातात.
असे म्हणतात, की प्रजापती ब्रह्मदेव चराचर सृष्टी निर्माण केल्यावर दमून याच शाल्मलीवृक्षाखाली विसावा घेण्यासाठी पडून राहिला. महादेवाला या वृक्षाची फुले फार आवडतात. ही फुले कपाच्या आकाराची असतात. यांना जेव्हा बहर येतो, तेव्हा धनाची देवता असलेल्या लक्ष्मीशी त्यांची तुलना करतात. श्रीलक्ष्मी देवी दोन्ही हात लांब करून आणि तळहातांवर प्रज्वलित दीप धारण करून उभी असावी, असे या वृक्षाचे स्वरूप दिसते.
संस्कृत भाषेत या वृक्षाला यमद्रुम म्हणजे पाताळातला वृक्ष म्हणतात. कारण हा जरी फुलांमुळे सुशोभित दिसत असला, तरी त्याची फळे खाण्यास योग्य नसतात. सात नरकांपैकी एका नरकामध्ये पापी माणसाला टोचून त्याला छळण्यासाठी या वृक्षाचे काटे वापरतात असे महाभारतात म्हटले आहे.

पिंपळ

पिंपळ
लॅटिन नाव - Ficus religiosa (फायकस रिलिजिओसा)
इंग्रजी नाव - बो ट्री, पीपल ट्री
भारतीय नावे - जारी (गुजराथी), अश्वत्थ, बोधद्रुम (संस्कृत), अवसाई/आरासू (मल्याळी)
कुल - वट कुल
कुळकथा - फायकस म्हणजे अंजीरवर्गीय, रिलिजिओसा म्हणजे पूजनीय. 'अश्वत्थ' या संस्कृत शब्दाचा अर्थ घोड्यासारखा उभा राहणारा. बोधद्रुम म्हणजे ज्या ठिकाणी माणसाला शाश्वत सत्य उमगते, ती जागा. पिपळ नावाचा उगम वेगळाच आहे. पॉप्लरवृक्षांच्या पानांचीही सळसळ होते. आर्य भारतात आले तेव्हा पिंपळाला पाहून त्यांना उत्तरेच्या प्रदेशाची आठवण झाली. पॉप्लरासारखा म्हणून त्याचे नाव पॅप्पल्-पिंपळ झाले. इटलीमध्ये आजही लागवड केलेल्या पिंपळाला भारतीय पॉप्लर किंवा पॉप्युलो डेले इंडी म्हणतात. भारतीय वनश्री ग्रंथात अगदी प्रारंभीच्या वर्गात पिंपळाचे वर्णन पॉप्लरासारखी पाने असलेल्या अंजीरवृक्षासारखा वृक्ष म्हणतात.
ficus-pimpaL.jpgपिंपळ, वड, उंबर हा भारतीयांच्या दृष्टीने धार्मिक महत्त्व असलेल्या वृक्षांचा संच. पिंपळाच्या तर नावातच धर्म. पिंपळ वृक्षात तारुण्य आणि प्रौढत्व यांचे एक अजब मिश्रण आढळते. हा एक विशालकाय वृक्ष. त्याची साल फिकट राखाडी आणि गुळगुळीत असते, तशीच खवल्या-खवल्यांचीही असते.
कोवळ्या फांद्या मृदू, चकचकीत असतात. पाने तर पिंपळाचे वैभव. ह्रदयाकृती निमुळत्या, लांबलचक पानांचा देठही लांबसडक असतो. कोवळी पाने लालचुटूक, गुळगुळीत आणि चिवट असतात. वार्‍याच्या लहानशा झुळकीनेही ती 'बोलू' लागतात. पिंपळपानांची सळसळ हा निसर्गसंगीतातला एक मनोहारी राग. पिंपळपानाची थोरवी महान. श्रीकृष्णाला जोजवणारं हे पान. प्रतिभावंत ज्ञानेश्वरांसाठी हा पिंपळ सोन्याचा होऊन सळसळतो.
फांदी आणि पान यांच्या बेचक्यात फुलांचे पेले येतात. हे पेले जोडीने येतात. या पेल्यांत येणारी फुले अगदीच बारीक, बिनरंगी असतात. कच्चे फळ हिरवे, तर पिकलेले फळ जांभुळके असते. पक्षी, वाघुळे या फळांसाठी पिंपळावर वस्ती करून राहतात. पिंपळाचा पाला उंट आणि हत्तींचे आवडते खाद्य आहे. सालींत टॅनिन असते आणि काही वेळा कातडे रंगवायला ते वापरतात. त्यापासून तांबडा रंगही बनवतात.
पिंपळाची साल, पाने, फळे प्रत्येकाचं आयुर्वेदाच्या दृष्टीने औषधी महत्त्व आहे. वात, रक्तविकार, गर्भस्थापनेसाठी या फळांचं चूर्ण देतात. जेथे बीज पडेल, तेथे वृक्ष उत्पन्न करणारा हा पिंपळ म्हणून हे महत्त्व असावे. भिंतीच्या फटींतून उगवलेली पिंपळाची रोपटी याचे पुरावे आहेत. धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे पिंपळ कधीच तोडला जात नाही. त्यामुळे आपोआप त्याचे संवर्धन आणि संरक्षण होत असते.
वैदिक काळामध्ये चकमकीचा वापर करून विस्तव तयार करण्यासाठी या झाडाचे लाकूड वापरत असत. या काळात चित्राद्वारा ग्रथित केलेले पहिले झाड पिंपळ हेच आहे. हिंदू धर्मातील त्रिमूर्तींशी पिंपळाचा संबंध आहे. पिंपळाची मुळे म्हणजे ब्रह्मदेव, त्याचे खोड म्हणजे विष्णू आणि त्याचे प्रत्येक पान म्हणजे एकेका दैवताची वास्तव्याची जागा आहे, असे अश्वत्थस्तोत्रामध्ये म्हटले आहे. एका दंतकथेत असे वर्णिले आहे, की विष्णूचा जन्म पिंपळाच्या वृक्षाखाली झाला. दुसर्‍या एका दंतकथेत म्हटले आहे, की एकदा शंकर-पार्वती खेळ खेळत असताना इतर देव तिथे आले. पार्वतीला राग आला. तिने त्यांना शाप दिला, की ते सर्व पृथ्वीवर झाडांचा जन्म घेतील. ब्रह्मदेव पळस वृक्ष झाला, रुद्र अंजीरसदृश झाड झाला आणि विष्णू पिंपळ झाला.
पिंपळ हे झाड 'ब्राह्मण' वृक्ष समजले जाते आणि ब्राह्मण त्याच्याखाली बसून प्रार्थना करतात. त्याला ते जानवेही घालतात. पिंपळ तोडला, तर ब्राह्मणकुटुंबाचा वध केला असे मानले जाते आणि तसे करणाराही लवकरच मरण पावतो असे समजतात. पिंपळाचा विवाह पुष्कळदा केळी किंवा लिंबू या झाडांशी भारतातल्या अनेक जमातींमध्ये लावण्यात येतो. अशी दोन झाडे एकत्र वाढत असली, तर त्यांना पती-पत्नी समजून एकांत दिला जातो. बोधगया येथील एका पिंपळाखालीच राजपुत्र सिद्धार्थाला साक्षात्कार झाला आणि तो 'बुद्ध' झाला असे म्हणतात. चिनी प्रवासी ह्युएनसंग याने त्यावेळी या वृक्षाबद्दल माहिती लिहून ठेवली आहे. गौतम बुद्ध हयात असताना हा वृक्ष शेकडो फूट उंच होता, असे तो म्हणतो. या वृक्षाची पाने सबंध वर्षभर तजेलदार हिरवी असतात, पण बुद्धनिर्वाणाच्या दिवशी मात्र ती सुकलेली व निर्जीव दिसल्याचे वर्णन असंख्य प्रवाशांनी लिहून ठेवले आहे.

पळस

पळस उर्फ वनज्योत
लॅटिन नाव - Butea frondosa / Butea monosperma (बुटिया फ्राँडोसा, बुटिया मोनोस्पर्मा)
इंग्रजी नाव - फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, पॅरट ट्री
भारतीय नावे - पलाश, ढाक, किंशुक (संस्कृत), परासु (तमीळ), मोडुगा (तेलुगू)
कुल - पतंगरूप कुल, शिंबी कुल
कुळकथा - पळसाचे बुटिया हे नाव जॉन स्टुअर्ट दि अर्ल ऑफ बुट या नावावरुन दिले गेले. सद्गृहस्थ, इंग्लंडचे पंतप्रधान, वनस्पतीप्रेमी होते. मोनोस्पर्मा म्हणजे एकबीजधारी आणि फ्राँडोसा म्हणजे पर्णयुक्त. किंशुक या संस्कृत नावात 'अरे, हा पोपट की काय?' असा आश्चर्योद्गार आहे. 'अहाहा! काय तजेलदार?' असाही एक अर्थ होतो. पलाश म्हणजे पाने आणि देखणेपणा, सौंदर्य.
palas.jpgपळस हा एक मध्यम आकाराचा पानगळी वृक्ष आहे. याचे खोड आणि फांद्या वेड्यावाकड्या असतात. साल खडबडीत, राखाडी रंगाची असते. मात्र कोवळ्या फांद्या गडद हिरव्या रंगाच्या, मऊ मखमली असतात.
पाने त्रिदली, आकाराने मोठी, काहीशी कडक असतात. कोवळी पाने तांबूस हिरवी असतात व त्यांवर मखमली लव असते. सर्व पाने गळून गेल्यावर पळसाला फुलांचे धुमारे फुटतात. आणि फुले फुलल्यावर संपूर्ण रूपच पालटून जाते. ग्रीष्माच्या सुरुवातीला महाराष्ट्राचा काळा, रांगडा कातळ या लालजर्द पलाशांनी रंगून गेल्यावर इतका कमालीचा देखणा दिसतो! फुले साधारण तीन तीन गुच्छांमध्ये येतात. त्यांचा रंग ज्वालेसारखा लालसर केशरी भगवा असतो. गुच्छ काहीसे ताठ, पाकळ्या मऊ मुलायम, चंदेरी लव असल्याने सूर्यप्रकाशात चमकणार्‍या असतात. पाकळ्या मागेच वळलेल्या असतात. त्यापैकी दोघींची बाकदार चोच बनते, म्हणून तर हा पॅरट ट्री.
फळ लांबट शेंगेच्या आकाराचे. परिपक्व फळ शुष्क तपकिरी आणि फळाच्या टोकाला एकच बी असते.
पळसाच्या लाल, खोडापासून स्त्रवणार्‍या डिंकाचा उपयोग कातडे कमावण्यासाठी करतात. लाखेचे किडे पळसाच्या कोवळ्या फांद्यांवर पोसतात. ही लाख रंगांत, सीलिंग वॅक्स म्हणून वापरतात. पानांच्या पत्रावळी बनवतात आणि क्वचित इरली बनवायलाही त्यांचा वापर होतो. मुळांपासून मिळणार्‍या धाग्यांचे दोर होतात. लाकूड पाण्यातही टिकून राहते, म्हणून होड्या बनवण्यासाठी वापरतात.
हा वृक्ष जेव्हा ऐन बहरात असतो, तेव्हा क्षितिजावर लखलखीत चमकणार्‍या ज्वालेसारखा दिसू लागतो. कवी कालिदासाने 'ऋतुसंहार' या आपल्या काव्यात पळसाचे वर्णन फार सुरेख केले आहे. तो म्हणतो, 'त्या वृक्षाची अरण्ये म्हणजे देदिप्यमान अग्नीच होत! या अरण्यामुळे सृष्टी म्हणजे लाल वस्त्रे परिधान केलेल्या वधूसारखी दिसत आहे.' कवी अमीर खुश्रूने पळसफुलांची तुलना सिंहाच्या रक्तरंजित पंजाशी केली आहे.
लोककथा - देवांची मदिरा म्हणजे सोमरस. त्याची उत्पत्ती चंद्रापासून होते. एकदा बहिरी ससाण्याने आपली पिसे सोमरसात बुडवली, त्यावेळी त्यातले एक पीस पृथ्वीवर पडले. त्या पिसापासून पळस निर्माण झाला, जो चंद्राला अतिशय प्रिय आहे.
आदिवासी लोकांमध्ये एक अंधश्रद्धा आहे, की अश्विनी नक्षत्राच्या काळामधे (सप्टें-ऑक्टो.च्या सुमारास) पळसाच्या मुळाचा एक भाग तोडून एखाद्या माणसाच्या हाताला बांधून ठेवल्यास, तो माणूस ज्या स्त्रीला स्पर्श करील, ती स्त्री त्याच्या प्रेमात पडते.
लोककथा - कारापुत आदिवासी लोकांच्या पेंगू, भग, मुरिया अशा तीन टोळ्या होत्या. चैतू भगताच्या मुलीचे लग्न त्याने आपल्या टोळीतल्या एकाबरोबर लावून दिले, ज्याच्यावर तिचे प्रेम नव्हते. मुरिया टोळीतल्या एका काळ्या सरदारावर तिचे मन जडले. टोळीतल्या लोकांना हे समजल्यावर त्यांनी तिच्या नवर्‍याला सावध केले आणि एक दिवस शिकारीला गेलो असे खोटे सांगून त्याने चैतू भगताच्या मुलीला त्या सरदाराबरोबर बोलत असताना पकडले. तो भयकंर संतापला आणि त्याने दोघांना ठार मारून त्यांची प्रेते जंगलात फेकून दिली. त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्त एकमेकांत मिसळून एक झरा तयार झाला आणि त्यातून हा वृक्ष जन्माला आला. तरुणीचे लाल आणि तिच्या प्रियकराचे काळे रक्त. म्हणून पळसाची फुले काळपट लाल रंगाची झाली.

केळी

केळी
लॅटिन नाव - Musa paradisiaca / Musa sapientum (मुसा पॅराडिसियाका/मुसा सॅपिएंटम)
इंग्रजी नाव - बनाना, प्लँटेन, अ‍ॅपल ऑफ पॅराडाईझ
भारतीय नावे - बाळे (कानडी), कदली, केला(हिंदी), वझह (मल्याळी), मोच, रंभा (संस्कृत), आरती (तेलुगू),
कुल - केळी कुल
kel-1.jpgकुळकथा - ऑक्टेव्हियस ऑगस्टस सीझर याचा जो वैद्य होता, त्याचे नाव होते अँटोनियो मुसा. त्याचेच नाव केळीला दिले गेले. 'पॅराडिसियाका'चा अर्थ स्वर्गीय. केळी स्वर्गातून इथे आल्या असे मानले जाते. ईडनच्या उद्यानात केळी फोफावल्या होत्या. अ‍ॅडम आणि ईव्ह यांनी केळीची पाने वस्त्रे म्हणून परिधान केली होती. मोच या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो रसाळ, दुसरा अर्थ विरागी. ज्याने इहलोकाच्या आशाआकांक्षांवर पाणी सोडले आहे असा. आश्चर्याची बाब म्हणजे सॅपिएन्टमचा अर्थसुद्धा शहाणा किंवा साधू असाच आहे. कदली म्हणजे ध्वज किंवा पताका. केला या हिंदी शब्दाचा अर्थ हलणारे किंवा थरथरणारे.
kel-2.jpgदारात केळीचा खांब रोवलेला दिसला. की शुभकार्याची आपसूक वार्ता मिळते. केळफुलाच्या किरमिजी पाकळ्यांच्या पदराआडून डोकावणार्‍या केळीच्या फण्या म्हणजे सुबत्तेचं, भरभराटीचं, वंशवाढीचं प्रतीक.
केळीचं झाडं दिसतंही किती शुभलक्षणी. पानं हिरवीगार, लुसलुशीत, सदा टवटवीत. ही एक बहुवर्षायू औषधी वनस्पतीच आहे. ती अतिशय जोमाने वाढते आणि एका वर्षात फळे देते. केळीचे खोड म्हणजे खरे खोड नव्हेच, खरे खोड एका कंदाच्या स्वरूपात असते. वरचे खोड म्हणजे पर्णतळाच्या एकात एक अशा बंदिस्त रचनेतून निर्माण होणारा खोडासारखा भास.
केळी, म्हणजे या वनस्पतींची फळे म्हणजे जणू लांबलचक, लवलवती, रसरशीत बोटेच. त्यांच्या साधारणतः १०-१२ फळांच्या फण्या असतात. प्रत्येक झाडाला अशी अनेक फळे येतात. फळाची साल अपरिपक्व अवस्थेत हिरवी जाडसर असते. पिकल्या फळाची साल मात्र पिवळी, कधी गुलाबीही असते. गर मधुर, बिनबियांचा असतो.
फळात अनेक खजिने असतात. लोह, कॅल्शियम, पोटॅशियम. त्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते. बालकाचा पहिला घन आहार म्हणून केळे देण्याची प्रथा आहे. कारण ते पचायला सोपे असते. कच्च्या केळ्यांची भजी, भाजी करतात. पाने जेवणासाठी वापरतात. रानकेळीची लागवड शेतीच्या बांधावर केली, की वाळवीचा उपद्रव कमी होतो.
लोककथा - केळी हा पार्वतीचा अवतार आहे, कारण केळीची पुनरुत्पत्ती स्त्रीबीज व पुंबीज यांच्या मीलनाशिवायच होते. गडचिरोलीतील आदिवासी लोकांमध्ये एक लोककथा आहे यासंदर्भात. पाच बहिणी होत्या. आंबा, चिंच, केळी, अंजीर आणि जांभूळ. इस्पुर देव त्यांचा पिता. तो काळजीत पडून त्यांच्यासाठी वर शोधत होता. इतर बहिणींना पती आणि खूप मुले हवी होती. पण केळीला आपल्या सौंदर्याचा नकोइतका अभिमान होता. ती म्हणाली मला पती नकोच आहे, मुलं पण थोडीच हवीत. मला लवकर म्हातारं आणि बोजड दिसायचं नाही. तसंच झालं. बहिणींना इतकी मुलं झाली, की मोजदादसुद्धा करता येईना. त्यांचं करता करता त्या मरून गेल्या आणि त्यांची झाडं झाली. त्यांचे केस त्यांच्या फांद्या झाल्या आणि मुलांचं रूपांतर फळांत होत राहिलं. केळीला नवरा नकोच होता आणि मुलं अगदी कमी. ती तजेलदार, सदा टवटवीत राहिली. वर्षातून एकदाच तिला फळे येत राहिली.

बेल

बेल
लॅटिन नाव - Aegle marmelos (ईगल मार्मेलॉस)
इंग्रजी नाव - वुड अ‍ॅपल, बेंगाल क्विन्स, गोल्डन अ‍ॅपल
भारतीय नावे - बिल्व, श्रीफल (संस्कृत/हिंदी), बिली (गुजराथी), विल्वम (तमीळ), मुरेडू (तेलुगू)
कुल - लिंबूकुळ
bel-Aegle.jpgकुळकथा - ग्रीक कथांत हेस्पेरिडेस नावाच्या तीन भगिनी वर्णिलेल्या आहेत. ग्रीक देवता हेरा हिचा झ्यूस या देवाशी विवाह झाल्यावर तिला सुवर्ण सफरचंदाची भेट मिळाली. एका ड्रॅगनच्या मदतीने हेस्पेरिडेस भगिनींपैकी ईगल नावाची एक अप्सरा या सुवर्ण सफरचंदाचे रक्षण करते. त्या अप्सरेच्या नावावरुन ईगल हे नाव लॅटिन भाषेत बिल्ववृक्षाला मिळाले. पोर्तुगीज भाषेत संगमरवरी म्हणजे मार्मेलोस्ड. त्यावरुन मार्मेलॉस ही संज्ञा आली. श्रीफल या संस्कृत नावाचा अर्थ लक्ष्मीचे फळ, पवित्र फळ.
बेल हा एक मध्यम उंचीचा पानगळी वृक्ष आहे. याची साल खडबडीत, राखाडी रंगाची असते. तपकिरी रंगाच्या फांद्यांवर जवळजवळ एक इंच लांबीचे काटे असतात. पाने एकांतरित आणि त्रिदली असतात. लंबगोलाकार आणि टोकदार पर्णिकांवर पारदर्शक तैलग्रंथींचे ठिपके असतात. फुले हिरवट पांढरी आणि सुवासिक असतात. फळे आकाराने मोठाली, गोल असतात. बाह्य कवच लाकडासारखे टणक, पांढुरके हिरवट असते. आतला गर केशरी भगवा असून त्यात धाग्यांत गुरफटलेल्या अनेक बिया असतात.
बेलफळाच्या गरापासून सरबत बनवतात. अतिसारावरचा तो एक खात्रीशीर उपाय. बेलतेलाचा वापर लाकडाला झिलई देण्यासाठी करतात. कीडरोधक म्हणूनही हे तेल उपयोगी असते. लाकूड घरबांधणीसाठी आणि हत्यारे बनवण्यासाठी वापरतात. कच्च्या फळांच्या कवचापासून पिवळा रंग निघतो तो कापडावरील छपाईसाठी वापरतात. पाने डोळ्यांवर पोटीस म्हणून बांधतात. वातविकारावरील दशमुळांपैकी बेलमूळ एक महत्त्वाचा घटक आहे.
बेलाच्या पानांत पार्‍याचा अंश असतो असे म्हणतात आणि या पार्‍यामुळे बिल्वपत्र ज्यात असते ते पाणी कधी खराब होत नाही. म्हणूनच कदाचित अभिषेकाच्या तीर्थात बिल्वदलं घातली जातात.
लोककथा - महादेवाच्या पूजेअर्चेत बेल वाहणे हा विधी अत्यंत आवश्यक मानला गेला आहे, त्यामुळेच शंकराच्या देवळाजवळ एकतरी बेलाचे झाड असतेच. बेलाच्या लाकडाचा दंड महादेवाने हातात धरलेला असतो, त्यामुळे महादेवाला 'बिल्वदंडिन्' असेही एक नाव आहे.
belphaL.jpgबेपर्वा माणसांबद्दल बोलताना-" बेल पकल कौआ के बोप ला का" (बेलाची फळे पिकली तरी कावळ्याला त्याचे काय?) सगळ्या पिकल्या फळांवर कावळा चोच मारतो, परंतु बेलाचे फळ इतके टणक असते, की कावळ्याची चोच त्यात घुसूच शकत नाही. त्यामुळे बेलफळ पिकले तरी कावळ्याला त्याचे सोयरसुतक काही नाही.
बेलाचे झाड आणि बोरीचे झाड जर एखाद्या जागेवर शेजारीशेजारी वाढली असतील, तर त्या जमिनीखाली झरा असणार असे समजतात.
एका तांत्रिक लोककथेमधे अशी गोष्ट सांगितली जाते, की लक्ष्मी एकदा गायीचे रूप घेऊन पृथ्वीवर आली. पवित्र गायीच्या शेणातून एक बेलाचे झाड उगवले. माणसाच्या कृत्याचे फळ लक्ष्मी त्याला देते, याचे प्रतीक म्हणून डाव्या हाताच्या तळव्यात बेलफळ घेतलेल्या लक्ष्मीचे दर्शन भुवनेश्वरीच्या तंत्रामध्ये दाखवले आहे.
नवीन कार्याच्या शुभारंभी लोक बेलास प्रदक्षिणा घालतात, कारण बेल नवे कार्य यशस्वी करून देतो असे म्हणतात.

कदंब

कदंब
लॅटिन नाव - Anthocephalus cadamba (अ‍ॅंथोसिफॅलस कदंब)
इंग्रजी नाव - कदंब
काही भारतीय नावे - कदंब, कदम, अट्टुटेक, नीपा, मंजा.
कुळकथा - अ‍ॅंथॉस या संज्ञेचा अर्थ फुले. सिफॅलास म्हणजे शिर किंवा डोके. फुलांच्या चेंडूसारख्या गुच्छामुळे हे नाव या वृक्षाला पडले. कदंब एक भव्य वृक्ष असून तो पानगळी जातीचा आहे. याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात.
kadamb.jpgपानांची फांदीवरील रचना जोडीजोडीची असते. ती आकारमानाने मोठी, अंडाकृती व तळाशी हृदयाकार असतात. पाने तुकतुकीत असून त्यांवर थोडी लव असते. कोवळ्या पानांना तांबूस झाक असते. पानांवरील उपशिरा ठळक आणि समांतर असतात.
फुले आकाराने अतिशय बारीक आणि पिवळट सोनेरी असतात. त्यांची मांडणी चेंडूच्या आकारासारखी असते. फुलांतून बाहेर पडणार्‍या कुक्षीवृंतांची प्रभा फुलांच्या गुच्छाभोवती फाकते आणि एक वलय निर्माण होते. म्हणूनच 'सोनेरी किरणांची प्रभा म्हणजे एक अद्भुत खजिना' असे त्याचे वर्णन केले आहे.
फळे अतिशय बारीक असतात. फुलांप्रमाणेच त्यांचा घोस तयार होतो. मात्र हा गेंद काळ्या रंगाचा असतो.
प्लायवुड आणि आगकाड्या तयार करण्यासाठी कदंबाचे लाकूड वापरतात. त्याची साल जंतुघ्न म्हणून उपयुक्त आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र, विशेषतः कोकण विभागात तसेच मुंबईतही अनेक ठिकाणी कदंबाचे हे केशरी गोल दिवे लगडल्यासारखे दिसणारे देखणे झाड पाहायला मिळते. या झाडाचा डेरा फार सुंदर छत्रासारखा पसरलेला असतो. दुर्गाबाई भागवतांनी तर केवळ या फुलावर एक खूप सुंदर, लालित्यपूर्ण भाषेतलं, अभ्यासू पुस्तक लिहिले आहे.
संस्कृत वाङ्मयात कदंबाचे साहचर्य मोसमी पावसाळ्याच्या ऋतूशी जोडलेले आढळते. ढगांचा गडगडाट कानी आला, म्हणजेच कदंब फुलू लागतो. पावसाच्या संगतीने येणारा वारा कदंबाच्या फुलांचा सुवास घेऊनच वाहतो. म्हणून त्या वार्‍याला कदंबनील म्हणतात. पूर्ण बहरलेल्या कदंबवृक्षाच्या ठायीठायी जमून राहिलेले पावसाचे पाणी मधाने भरलेल्या पाण्यासारखे गोड लागते, म्हणून त्याला कदंबरी म्हणतात.
स्कंदपुराणामध्ये कृष्ण आपल्या सवंगड्यांसमवेत या कदंबांच्या चेंडूंशी खेळत असल्याचे मनोहारी उल्लेखही मिळतात. श्रीकृष्ण आपली बासरी वाजवत कदंबाखालीच उभा राहतो. अतिविषारी कालिया नाग कालिया दाह डोहात राहू लागला. त्याच्या फुत्कारांमुळे त्याच्यापासून काही मैलांच्या अंतरावर असलेले प्राणी, वृक्ष-वनस्पती जळून गेले. फक्त त्या डोहाच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या भूप्रदेशावर एक कदंबवृक्ष मात्र जिवंत राहू शकला. त्याचे कारण स्वर्गलोकात अमृत प्राशन करून गरुड पृथ्वीवर परतत असताना या वृक्षावर बसला होता आणि त्याने आपली चोच फांदीला घासली. तेव्हा चोचीतले काही अमृताचे थेंब या वृक्षावर पडले आणि त्याला अमरत्व प्राप्त झाले.
देवांनी अमरत्व दिलेल्या कदंबावर माणसांच्या राज्यात मात्र समूळ नष्ट होण्याची वेळ आली. महाराष्ट्रात गेली काही वर्षे विकासाच्या नावाखाली जी अनिर्बंध वृक्षतोड चालू आहे, त्यात कदंबाच्या वृक्षांवरही घाला आला आहे. काही वर्षांनी या सुंदर झाडांचे उल्लेख "कदंबतरूला बांधुनी दोले, उंच खालती झोले, परस्परांनी दिले घेतले गेले ते दिन गेले." अशा काव्यपंक्तींमध्येच करावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तुळस

तुळस
शास्त्रीय नाव - Oscimum sanctum (ऑसिमम सँक्टम) (होली बेसिल)
काही भारतीय नावे - वृंदा (बंगाली), मंजिरी (संस्कृत), बिंदा, गग्गेरू( तेलुगू), भूतघ्नी, बहुमंजरी, अजेतराक्षसी, गौरी, अमृता, श्रेष्ठतमा.
tulas-better-snap.jpgकुळकथा - ऑसिमम या संज्ञेचे मूळ ग्रीक शब्दात आहे. त्याचा अर्थ मधुर वनस्पती. सँक्टम म्हणजे पवित्र. तुलसी म्हणजे एकमेव, अद्वितीय. वृंदा म्हणजे फुलांचा घोस.
प्राचीन काळी मंदिरे ही पांथस्थांची आश्रयस्थाने होती. मंदिरांच्या प्रांगणांत तुळशी लावलेल्या असत. तृषा शमवण्याचा उत्तम गुणधर्म तुलसीपत्रात आहे. चार पाने जिभेखाली ठेवली, तर थकल्या-भागल्या, तहानलेल्या पांथस्थाची तहान कमी होते. काळाच्या ओघात तुळशीचा हा गुणधर्म स्मृतीआड झाला आणि मंदिरांच्या प्रांगणांत तुळशीला धार्मिक वनस्पती म्हणून महत्त्व आले.
तुळस ही एक लहानशी, उभी वाढणारी शाखायुक्त वनस्पती असून तिच्या सर्वांगावर लव असते. पानांच्या कडा दंतुर असून त्यावरील तैलग्रंथी ठिपक्यांसारख्या असतात आणि पाने चुरल्यावर त्यांना उग्र वास येतो. फांद्यांच्या टोकांशी पुष्पमंजिर्‍या येतात. फुले आकाराने लहान, फिकट गुलाबी जांभळ्या रंगाची असतात. फळे अतिशय लहान आकारमानाची असून बिया तांबूस तपकिरी असतात.
तुळस औषधी आहे. तिची पाने सर्दी, पडसे, खोकल्यावर गुणकारी असतात. बिया पचनसंस्थेच्या विकारांवर उपयोगी आहेत. पानांपासून निघणारे तेल जंतुघ्न असून त्वचारोगांत वापरतात. कीटकनिवारक, विशेषतः मलेरियाच्या डासांचा प्रतिकार करण्याकरता संपूर्ण वनस्पतीच सज्ज असते. ओझोनकर्ता, प्रदूषणहर्ता अशी तुळस आजूबाजूची हवा शुद्ध करते.
पर्यावरणीय आणि वैद्यकीयदृष्ट्या अतिशय उपयुक्त अशा तुळशीला पूर्वजांनी मानाचं स्थान दिलं. फूल, फळ, छाया याबाबतीत दुय्यम असणारी तुळस सामान्यजनांकडून दुर्लक्षिली जाऊ नये म्हणून तिला धार्मिक अवगुंठन घालून त्यांनी नित्यपूजनीय ठरवलं. एक हजार एकशे आठ तुळशी वाहिल्याशिवाय श्रीकृष्णजन्माचा सोहळा पूर्ण होत नाही. नैवेद्य दाखवताना वरण-भाताच्या मुदीवर तुळशीचे पान ठेवले जाते, ते तिचा वातावरण शुद्ध राखण्याचा गुणधर्म लक्षात घेऊन. या नाजूक रोपाला रोज पाणी मिळेल, त्याचे वृंदावनांत संगोपन होईल अशी व्यवस्था केली. कुठच्याही आडवेळी खुडण्यास मनाई केली.
हिंदुधर्मात श्रीविष्णूची पूजा करताना तुळस अत्यावश्यक मानली गेली आहे. पद्मपुराणात सांगितले आहे, की तुळशीच्या रोपाभोवतालची मातीसुद्धा पवित्र असते. जर एखाद्या प्रेताचे दहन करताना चितेवर तुळशीच्या काड्या घातल्या तर त्या माणसाचा आत्मा कायम विष्णुलोकात राहतो, त्याचा पुनर्जन्म होत नाही, अशी हिंदुधर्मात समजूत आहे. पूजेसाठी दिवा लावताना त्यात तुळशीची काडी घातली, तर लाखो दिवे लावल्याचे श्रेय लाभते.
तुळस म्हणजे विष्णुपत्नी लक्ष्मीचा अवतार. कृष्णाची राधा म्हणजे तुळसच. बालपणी कृष्ण मथुरेजवळच्या ज्या उपवनात राधेबरोबर क्रीडा करत असे, त्या उपवनाला वृंदावन असे म्हणतात. वृंदा म्हणजे राधा, म्हणून तुळशीला वृंदा असेही नाव आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल द्वादशीला तुळशीचे लग्न समारंभपूर्वक बाळकृष्णाशी लावण्यात येते.

निलगरी झाडाची फुले